कॉफीच्या पाच भारतीय जातींना भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून 'जीआय' (Geographical Indication - GI) टॅग मिळाला आहे. यामध्ये कर्नाटकातल्या कोडगू जिल्यात उत्पादन होणाऱ्या Coorg Arabica, केरळातल्या वेनाड जिल्ह्यातली Wayanaad Robusta, कर्नाटकातील चिकमंगळूर येथे उत्पादन होणारी Chikmagalur Arabica आणि Bababudangiris Arabica आंध्रप्रदेश आणि उडिसाच्या डोंगराळ भागांत उत्पादन होणारी Araku Valley Arabica या पाच कॉफीच्या जातींचा समावेश आहे.
दक्षिण भारतातला डोंगराळ प्रदेश हा कॉफीच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात सुमारे ४.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर कॉफीची लागवड केली गेली आहे. भारतात सुमारे ३ लाख ६६ हजार कॉफी उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांपैकी ९८ टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. कॉफीचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटक (५४%) राज्यात होतं. त्याशिवाय केरळ (१९%), तामिळनाडू(८%), आंध्रप्रदेश व ओडिसा (१७.%), तर ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये १.८ टक्के कॉफीचं उत्पादन होतं. बहुतांश कॉफी उत्पादन हे पश्चिम आणि पूर्व घाटातल्या आदिवासी लोकांकडून होतं.
विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादन होणारा शेतमाल वा वस्तू यांना त्या प्रदेशाचा जीआय टॅग दिला जातो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कुठेही ती वस्तू विकावी गेली तरी तिच्या उत्पादनाच्या मूळ स्थानाची ओळख तिला दिली जाते. जीआय टॅग मिळाल्यामुळे भारतातल्या विशिष्ट भागांत उत्पादन होणाऱ्या कॉफीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख मिळणार आहे. विशिष्ट भागात उत्पादन होणाऱ्या कॉफीची विशिष्ट गुणवत्ता राखली जाण्यास या 'जीआय टॅग' मुळे मदत होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किंमत मिळण्यासही या 'जीआय टॅग'चा उपयोग होणार आहे. 'जीआय टॅग'मुळे अन्य ठिकाणच्या कॉफीची खोटी ओळख दाखवण्यास प्रतिबंध होणार आहे, तसेच ग्राहकालाही कॉफीच्या स्रोताची सत्यता पडताळून पाहता येणार आहे. कॉफी उत्पादकांना उत्पन्नवाढीसाठी 'जीआय टॅग'चा उपयोग होणार आहे.
udyogvivek@gmail.com