पूर्व भारत हा 'चहाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो. आसाममध्ये चहा हे राज्याचं पेय म्हणून ओळखलं जातं. भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. भारतातल्या छोट्या चहा उत्पादकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ट्रिनिटी (Trinitea ) नावाचा एक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. येत्या ४ एप्रिल रोजी कोलकाता येथे या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. नेदरलँडची कंपनी 'सॉलिडॅरिदाद' आणि 'इंडियन टी असोसिएशन' यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे. छोट्या चहा उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांशी जोडून देणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. छोट्या चहा उत्पादकांना हवामानविषयक माहिती, माती परीक्षण, खते आणि कीटकनाशक व्यवस्थापन इ. बाबतीत आवश्यक त्या सेवा पुरवल्या जाणार आहेत.
भारतातल्या एकूण चहा उत्पादक शेतकऱ्यांपैकी सुमारे ४७ टक्के शेतकरी हे 'छोटे शेतकरी' या गटात मोडणारे आहेत. या छोट्या चहा उत्पादकांकडून दरवर्षी ५ लाख टन एवढ्या चहाच्या पानांचे उत्पादन होते.
'सॉलिडॅरिदाद' ही जगभरातल्या नऊ भागांमध्ये १३ वस्तूंच्या शाश्वत उत्पादनासाठी काम करणारी कंपनी आहे. कापूस, चहा, ऊस, फळे आणि भाज्या, सोने, सोयाबीन, कोको, वस्त्र, पामतेल, मासे, दूध, गुरे, आणि कॉफी या तेरा वस्तूंच्या शाश्वत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही कंपनी काम करते. 'इंडियन टी असोसिएशन' ही भारतातल्या चहा उत्पादकांची संघटना असून चहा उत्पादन आणि व्यापाराची महत्त्वाची धोरणं या कंपनीकडून ठरवली जातात. सद्यस्थितीत भारतात सुमारे १३ लाख टन चहाचे उत्पादन होते. यापैकी सुमारे १० लाख टन चहाचे देशांतार्गत बाजारात वितरण होते, तर सुमारे अडीच लाख टन चहा निर्यात केला जातो. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, आसाम, दार्जिलिंग, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या भागांमध्ये मुख्यतः चहाचे उत्पादन होते. 'ट्रिनिटी' प्रकल्पामुळे भारतात चहा उत्पादनाला आणखी बळकटी मिळणार आहे.
- udyogvivek@hmail.com